पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. त्यातच गॅस सिलिंडरच्या दरातही वाढ करण्यात आली आहे. याचे तीव्र पडसाद सर्वत्र उमटत आहेत. काँग्रेसने देखील ही इंधन दरवाढ तात्काळ मागे घ्यावी, अन्यथा रस्त्यावरून उतरून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. 23 फेब्रुवारीला होणाऱ्या बैठकीत या आंदोलनाची दिशा निश्चित करण्यात येणार आहे.
प्रदेश काँग्रसचे कार्याध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्याशी आज गांधी भवन येथे चर्चा केली. संघटना मजबूत करण्याबाबत या बैठकीत सखोल चर्चा झाली. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह कार्याध्यक्ष, प्रदेश उपाध्यक्ष उपस्थित होते. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. मोदी सरकारमुळे सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. कोरोनाच्या संकटामुळे लाखो लोकांनी रोजगार गमावले आहेत. अशातच इंधन दरवाढ करून मोदी सरकारने लूट चालवली आहे, असे ते म्हणाले.
सेलिब्रिटी गप्प का?
यूपीएचे सरकार लोकशाही मार्गाने चालणारे सरकार होते, म्हणून 70 रुपये लिटर पेट्रोल झाले त्यावेळी अभिनेते अमिताभ बच्चन, अक्षय कुमार यांच्यासह इतर सेलिब्रिटिंनी इंधन दरवाढीविरोधात ट्विट करून संताप व्यक्त केला होता. आता पेट्रोलने शंभरी गाठली असताना मोदी सरकारच्या हुकूमशाही विरोधात बोलण्याची कोणाची हिम्मत नाही, अशी टीका नाना पटोले यांनी केली.
राज्यपालांवर कायदेशीर कारवाईचा विचार
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे महाविकास आघाडीच्या अनेक निर्णयांमध्ये आडमुठी भूमिका घेत आहेत. 12 राज्यपाल नियुक्त आमदारांच्या पत्रावर अजूनही राज्यपालांनी सही केलेली नाही. त्यामुळे राज्यपालांविरोधात कायदेशीर कारवाई करण्यासंबंधी ठाकरे सरकार विचार करत असल्याची माहिती नाना पटोले यांनी यावेळी दिली.
Comments
Loading…