राज्य मंत्रिमंडळाची बैठक बुधवारी झाली. या बैठकीत लॉकडाऊनबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या पाहता लॉकडाउन लागू करायचा की निर्बंध अधिक कठोर करायचे, असा सवालच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला. यावर टाळेबंदी नको तर निर्बंध कठोर करण्यावर मंत्र्यांमध्ये सहमती झाली असल्याचं समजतं.
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा झपाट्यानं वाढत आहे. यासंदर्भात मंत्रीमंडळाच्या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. जास्त रुग्ण आढळलेल्या काही शहरांमध्ये लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. राज्यात सध्या सरासरी २५ हजारांच्या आसपास दररोज रुग्ण आढळत आहेत. लॉकडाउनमुळे आधीच अर्थव्यवस्था डगमगली होती. त्यामुळे पुन्हा एकदा टाळेबंदी लादण्याचा सरकारचा विचार नसल्याचं समजतं.
१ फेब्रुवारीला राज्यात १९४८ नवे रुग्ण आढळले होते. तर २४ मार्चला राज्यात एका दिवशी ३१ हजार रुग्ण आढळले. सध्या ६० टक्के रुग्ण हे गृह विलगीकरणात आहेत. यापैकी काही रुग्ण बाहेर फिरतात व त्यातून संसर्ग वाढतो. म्हणूनच संस्थात्मक विलगीकरण करावे यावरही चर्चा करण्यात आली.
Comments
Loading…