चिटफंड व्यावसायिक आनंद उनवणे खून प्रकरणाचा उलगडा झाला आहे. त्यांच्याकडे काम करणाऱ्या एका कामगारानेच त्यांचा खून केल्याचे समोर आलं आहे. या घटनेत तब्बल २ हजार सीसीटीव्हीच्या फुटेजची तपासणी करण्यात आली आहे. मात्र अद्याप मुख्य आरोपी फरार आहे.
चिटफंड व्यावसायिक आनंद उनवणे यांचं अपहरण करून खून करण्यात आला होता. मुख्य आरोपीला दीड वर्षांपूर्वी कामावरून काढून टाकण्यात आले होतं. त्याचा राग मनात धरून आनंद उनवणे यांचे इतर चार जणांच्या मदतीने अपहरण करण्यात आले होते व त्यानंतर धावत्या मोटारीत दोरीने गळा आवळून खून करण्यात आल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे.
याप्रकरणी उमेश सुधीर मोरे, बाबु ऊर्फ तुळशीराम नथुराम पोकळे, सागर दत्तात्रय पतंगे, दिपक धर्मवीर चांडालिया यांना अटक करण्यात आली असून, अपहरणातील सोन्याच्या दागिन्यांचा मुद्देमाल विकत घेणाऱ्या तीन व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले आहे.मात्र अद्याप मुख्य सूत्रधार आरोपी प्रभू पुजारी हा फरार असु, त्याचा शोध पोलीस घेत आहेत.
प्रकरण काय ?
३ फेब्रुवारी रोजी आनंद उनवणे यांचे त्यांच्या राहत्या घराच्या खालून, मुख्य आरोपी प्रभू पुजारी याने इतर चार साथीदारांच्या मदतीने रात्री अपहरण केले होते. आरोपींनी उनवणे यांच्याकडून कार्यालयातून व घरातून एकुण ६४ लाखांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. ४ फेब्रुवारी रोजी मोटारीतून हिंजवडी येथून ताम्हणी घाटात घेऊन गेले. तिथे मोटारीतच उनवणे यांचा दोरीने गळा आवळून खून केला. पुरावा नष्ट करण्याचा हेतून त्यांचा चेहरा दगडाने ठेचून मृतदेह महाड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सावित्री नदीमध्ये फेकून देण्यात आला. हे सर्व प्रकरण दिनांक ६ फेब्रुवारी रोजी उजेडात आलं आणि त्यांचा मृतदेह नदीत आढळल्याने एकच खळबळ उडाली. महाड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला.
Comments
Loading…