राज्यभरातील कोरोना परिस्थिती हाताळण्यासाठी राज्य सरकारने नवी कडक नियमावली जाहीर केली असून यापुढे वीकएन्डला संपूर्ण संचारबंदी असणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची राज्य मंत्रिमंडळासोबत बैठक पार पडली. यानंतर अनेक गोष्टींमधील शिथिलता कमी करण्यात आली आहे. तसेच यापुढे संपूर्ण राज्यभरात शनिवारी आणि रविवारी लॉकडाउन असणार आहे. याचसोबत मॉल्स, मंदिरे, नाट्यगृह आणि चित्रपटगृह पूर्णपणे बंद असतील.
या काळात अत्यावश्यक सेवा पूर्णपणे सुरू असणार आहेत. तसेच शेतमाल वाहतूक सुरळीत असणार आहे.
मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी निर्णयांची माहिती दिली. राज्यात उद्यापासून कडक नियम लागू होणार असून, रात्री ८ वाजेपासून सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी असणार आहे. तसेच दिवसा १४४ कलम लागू (जमावबंदी) असेल, असं अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी सांगितलं.
अशी आहे नियमावली….
शेतीविषयक कामे सुरु
शेती व शेतीविषयक कामे, अन्नधान्य व शेतमालाची वाहतूक नेहमीप्रमाणे सुरळीतपणे सुरू राहील.
रात्री संचारबंदी, दिवसा जमावबंदी
राज्यात १४४ कलम लागू केले जाईल. सकाळी ७ ते रात्री ८ जमावबंदी म्हणजे ५ पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई राहील तसेच रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत कोणत्याही व्यक्तीस योग्य कारणाशिवाय बाहेर पडता येणार नाही.यातून वैद्यकीय व इतर अत्यावश्यक सेवा वगळण्यात येतील. बागा, चौपाट्या, समुद्र किनारे आदी सार्वजनिक ठिकाणे रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत पूर्णतः बंद राहतील.
आवश्यक सेवेतील दुकानेच सुरु
किराणा, औषधी, भाजीपाला आदी जीवनावश्यक व आवश्यक वस्तू सोडून इतर सर्व प्रकारची दुकाने, मॉल्स, बाजारपेठा, ३० एप्रिलपर्यंत बंद राहतील.
सर्व प्रकारची वाहतूक नियमितपणे सुरूच
सार्वजनिक व खासगी अशी सर्व प्रकारची वाहतूक नियमितपणे सुरूच राहील. रिक्षांमध्ये चालक व दोन प्रवासी, टॅक्सीमध्ये चालक आणि निश्चित केलेल्या प्रवाशांपैकी ५० टक्के प्रवासी प्रवास करू शकतील. बस चालक, वाहक व इतर कर्मचारी यांनी आपले लसीकरण पूर्ण करावे किंवा कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्र बाळगावे.
वित्तीय सेवा सोडून इतर खासगी कार्यालये बंद
खासगी कार्यालयांनी पूर्णपणे वर्क फ्रॉम होम करणे बंधनकारक राहील. केवळ बँका, स्टॉक मार्केट, विमा, औषधी, मेडिक्लेम, दूरसंचार, अशी वित्तीय सेवा देणारी तसेच स्थानिक आपत्ती व्यवस्थापन, वीज , पाणी पुरवठा करणारी कार्यालये मात्र सुरू राहतील.
शासकीय कार्यालये ५० टक्के उपस्थितीत
शासकीय कार्यालये जी थेट कोरोनाशी संबंधित नाहीत तेथील कर्मचारी उपस्थिती 50 टक्के मर्यादेपर्यंत राहील. शासकीय कार्यालयांत अभ्यागतांना प्रवेश नसेल. आवश्यक असेल तर कार्यालय किंवा विभाग प्रमुखाचा प्रवेश पास लागेल.
मनोरंजन, सलून्स बंद
मनोरंजन व करमणुकीची स्थळे बंद राहतील. चित्रपटगृहे, मल्टिप्लेक्स, नाट्यगृहे, व्हिडीओ पार्लर्स, क्लब्स, जलतरण तलाव, क्रीडा संकुले, सभागृहे, वॉटर पार्क्स पूर्णपणे बंद राहतील.
प्रार्थना स्थळे दर्शनार्थीसाठी बंद
सर्वधर्मीयांची स्थळे, प्रार्थना स्थळे बाहेरून येणारे भक्त व दर्शनार्थीसाठी बंद राहतील मात्र याठिकाणी काम करणारे कर्मचारी , पुजारी वगैरे यांना दैनंदिन पूजा अर्चा करता येईल.
ई कॉमर्स सेवा सुरु
ई कॉमर्स सेवा नियमितपणे सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत सुरूच राहील. होम डिलिव्हरी देणाऱ्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण झालेले असणे अत्यावश्यक आहे. अन्यथा त्या व्यक्तीस 1000 रुपये आणि संबधीत दुकान किंवा संस्थेस 10 हजार रुपये दंड ठोठावण्यात येईल.
वृत्तपत्रे छपाई आणि वितरण सुरु
वृत्तपत्रे छपाई आणि वितरण नेहमीप्रमाणे सुरू ठेवण्यात येईल मात्र विक्रेत्यांनी लसीकरण करून घ्यावे. शाळा- महाविद्यालये बंद राहतील. मात्र १०वी व १२वी परीक्षांचा अपवाद असेल. सर्व खासगी क्लासेस बंद राहतील.
Comments
Loading…