पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांना राष्ट्रपती केलं होतं, असा दावा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एका कार्यक्रमात केला आहे. पाटील यांच्या या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशच्या वतीनं तरुणाईला जोडण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या युवा वॉरियर्स अभियानाचा शुभारंभ चंद्रकांत पाटलांच्या हस्ते पुण्यात झाला. यावेळी ते बोलत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व मुस्लीम बांधवांना स्थान दिलं आहे. त्यांनी अब्दुल कलाम यांनादेखील राष्ट्रपती केलं होतं. मुस्लीम म्हणून त्यांना राष्ट्रपती केलं नाही तर एक कर्तुत्ववान, संशोधक म्हणून केलं होतं, असा अजब दावा पाटील यांनी केला आहे. चंद्रकांत पाटलांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.
‘स्वातंत्र्य लढ्यात युवकांचं मोठं योगदान राहिलेलं आहे. तसंच योगदान आजच्या तरुणाईनंही द्यायला हवं. या पिढीला खरा इतिहास सांगण्याची गरज आहे’, असेही पाटील यावेळी बोलताना म्हणाले.
Comments
Loading…