in ,

शेतकरी आंदोलनाचे गांभीर्य केंद्र सरकारला कळायला हवे : शरद पवार

लोकशाही न्यूज नेटवर्क

शेतकरी आंदोलनाचे गांभीर्य केंद्र सरकारला कळायला हवे. शेतकऱ्यांची अस्वस्था पाहून केंद्र सरकार मधील वरिष्ठ मंत्र्यांनी यामध्ये लक्ष घालयला हवे होते. असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज व्यक्त केले.

शेतकऱ्यांची चर्चा करणारे रेल्वे मंत्री पियुष गोयल काही कृषी तज्ज्ञ नाहीत. गोयल माझे चांगले मित्र आहेत. मात्र ते शेतीतज्ज्ञही आहेत हे कळाल्याने माझ्या ज्ञानात भर पडली, अशी कोपरखळी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी रेल्वे मंत्री पियुष गोयल यांना मारली. बारामती येथे एका कार्यक्रमानंतर पवार माध्यमांशी बोलत होते. ते पुढे म्हणाले, ज्यावेळी चार ते पाच राज्यातील शेतकरी ऊन, पाऊस थंडीमध्ये रस्त्यावर येऊन आंदोलन करतात. त्यावेळी सरकार संवेदनशील असले पाहिजे. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, नितिन गडकरी यांच्या सारख्या वरिष्ठ मंत्र्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करायला हवी.

नवीन कृषी कायद्याची चर्चा अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना २००३ मध्ये सुरू झाली. त्यानंतर २००४ मध्ये मी केंद्रीय कृषी मंत्री असताना या कृषी कायद्या संदर्भात अभ्यास करून ड्राफ्ट तयार करण्यासाठी तत्कालीन मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नऊ राज्यांच्या कृषी मंत्र्यांची एक समिती नेमण्यात आली. हा ड्राफ्ट तयार झाल्यानंतर या कायद्यासंदर्भात राज्यांनी विचार करावा यासाठी ड्राफ्ट राज्यांना पाठवण्यात आला. मात्र, २०१४ मध्ये नवीन सरकार आल्यानंतर एकदम कायदा तयार, संसदेत आणला, गोंधळात मंजूर केला गेला.

कोणताही कायदा तयार करताना त्यावर चर्चा होणे गरजेचे असते. घटनेप्रमाणे शेती संदर्भातील निर्णय घेण्याचा अधिकार सबंधित राज्यांना आहे. त्यामुळे संपूर्ण देशात कृषी कायदा लागू करण्यापूर्वी केंद्र सरकारने एकदा राज्यांशी बोलायला हवे होते. हा विषय राज्यांचा असताना केंद्राने राज्यांना विश्वासात घ्यायला हवे होते. मात्र राज्यांना विश्वासात न घेता मोदी सरकारने हा कायदा तयार केला, त्याबाबत माझी तक्रार आहे. शेतीमध्ये जेथे शक्य होईल तेथे सुधारणा करणे गरजेचे आहे. त्याबाबत काही तक्रारी आहेत त्या चर्चेने सोडवता येतात, असेही पवार यावेळी म्हणाले.

नारायण राणे यांचे विधान विनोदी..

नारायण राणे आमचे जुने सहकारी आहे. मात्र, ते विनोद करतात हे मला माहिती नव्हते. कालचे त्यांचे विधान राजकारणातला विनोद आहे. त्याला जास्त महत्त्व द्यायची गरज नाही, अशा शब्दात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी नारायण राणे यांना टोला लगावला. भाजप नेते नारायण राणे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या पायगुणाने राज्यातील सरकार जावे असे विधान केले होते. त्यावर माध्यमांनी पवार यांना छेडले असता, या विषयाला जास्त महत्त्व द्यायची गरज नाही, असे ते म्हणाले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

IND Vs ENG : तिसऱ्या दिवसाअखेर भारत ६ बाद २५७

मराठी भाषेवरुन मनसे पुन्हा आक्रमक