राज्यात मंत्रिमंडळाची बैठक झाली असून, या बैठकीत तीन मोठे निर्णय घेण्यात आलेत. या बैठकीमध्ये पर्यटनाला चालना देण्यासाठी कॅरॅव्हॅन आणि कॅरॅव्हॅन पार्क या सुविधा पर्यटकांना उपलब्ध करून देण्यासाठी कॅरॅव्हॅन पर्यटन धोरण राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्याच प्रमाणे राज्यात कौशल्य विद्यापीठ स्थापन करण्यात येणार असून, विधेयकास विधिमंडळात मांडण्यास मान्यता देण्यात आली आहे.
कॅरॅव्हॅन पार्क आणि कॅरॅव्हॅन असे दोन भाग या धोरणात असून, यामुळे राज्यातील वैविध्यपूर्ण निसर्ग सौंदर्याचा लाभ पर्यटकांना घेता येईल. तसेच यामुळे रोजगाराच्या संधी देखील उपलब्ध होतील. मुद्रांक शुल्कामध्ये सूट, राज्य वस्तु व सेवा कराचा परतावा, विद्युत शुल्कामध्ये सूट इत्यादी प्रोत्साहने कॅरॅव्हॅन पार्क आणि कॅरॅव्हॅन पर्यटनाकरीता लागू राहतील. या धोरणामुळे दुर्गम भागातील पर्यटनाला चालना देऊन रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे यामुळे शक्य होणार आहे.
तसेच राज्यात महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ स्थापन करण्यास आणि यासंदर्भातील विधेयक 2021 विधिमंडळात मांडण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. महाराष्ट्रात असलेले उद्योग समूहांचे मोठे जाळे व रोजगाराच्या प्रचंड संधी विचारात घेता राज्यात सार्वजनिक कौशल्य विद्यापीठाची स्थापना करणे आवश्यक होते.उद्योगांच्या मागणीनुसार तांत्रिक क्षमता आणि विविध कौशल्यप्राप्त असे मनुष्यबळ निर्माण व्हावे असा कौशल्य विद्यापीठ स्थापनेचा उद्देश आहे. विद्यापीठ प्रशासन आणि इमारतीच्या खर्चापोटी दरवर्षी सुमारे 50 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यासही मान्यता देण्यात आली.
Comments
Loading…