राम मंदिराच्या उभारणीसाठी भाजपा तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित हिंदुत्ववादी संघटनांनी निधी संकलनास सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कालच (3 मार्च) टीका केली होती. तर, आज (4 मार्च) पुन्हा एकदा काँग्रेसने हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर विधानसभेत गदारोळ झाला.
नावानं पैसे जमा करणारे हे लोक कोण? निधी संकलनाचा ठेका दिला आहे आहे का? ते कोणत्या नियमाखाली ही देणगी जमा करत आहेत? राम मंदिराच्या नावाखाली टोलवसुली सुरू असून केंद्र सरकारनं याचे उत्तर द्यायला हवे, असे जोरदार टीकास्त्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सोडले. त्यानंतर विधानसभेत जोरदार गदारोळ झाला. भाजपा आमदारांनी घोषणाबाजी केली. सभागृहातील गदारोळामुळे सभागृहाचे कामकाज काहीकाळ स्थगित करण्यात आले..
नाना पटोले यांनी यासंदर्भात एका व्यक्तीला आलेला अनुभव सांगितला. ते म्हणाले की, काही दिवसांपूर्वी एक माणूस भेटला होता. अयोध्येत उभारण्यात येणाऱ्या राम मंदिरासाठी निधी संकलित केला जात आहे. महाराष्ट्रातही हे काम सुरू आहे, पण त्यासाठी लोकांना त्रास दिला जात आहे. 30 वर्षापूर्वी देणगी स्वरुपात मी पैसे दिले होते. त्याचा हिशेब मागिल्यावर हिंदू धर्मातून बहिष्कृत करण्याची धमकी त्यांनी त्या व्यक्तीला दिल्याचे पटोले यांनी सांगितले.
तर चर्चाच करा, फडणवीसांचे प्रत्युत्तर
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे राम मंदिर उभे राहात आहे आणि आता राम मंदिरासाठी हे घरोघर पैसे मागत फिरत आहेत. असे असले तरी ते आमच्यामुळे होते आहे, असे त्यांना दाखवायचे आहे, अशी टीका मुख्यमंत्री ठाकरे यांनी काल केली होती. त्यातच आज पटोले यांनी पुन्हा हा विषय काढला. त्यावरून विरोधी पक्षनेते आक्रमक झाले. राम मंदिराबाबत बोलायचेच असेल तर, त्यासाठी स्वतंत्र चर्चा ठेवण्यात यावी. ज्यांना खंडणी वसूल करायची सवय असते, त्यांना जनतेचं समर्पण काय आहे? हे समजत नसल्याची टीका त्यांनी केली.
Comments
Loading…