संजय राठोड आणि मनसुख हिरेन प्रकरण पाहता, राज्यात सध्या राजकारणाचे गुन्हेगारीकरण होत आहे असे म्हणावे लागेल, अशी टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. येथे हम करे सो कायदा, हीच प्रवृत्ती बळावत असल्याचेही ते म्हणाले.
भाजपच्या कार्यकारिणीची बैठक आज (6 मार्च) झाली. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन बैठकीची माहिती दिली. तसेच, मनसुख हिरेन प्रकरणावरून महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला. मंत्री असो वा अन्य कोणी गुन्हेगारांना संरक्षण दिले जात आहे. संजय राठोड यांचे वनमंत्रीपदाचा राजीनामा देखील सहजासहजी घेतला गेला नाही. यासाठी आम्हाला रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागले. तसेच, प्रसार माध्यमांनीही हे प्रकरण लावून धरल्याचा हा परिणाम होता, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
या राज्यात कोणाचेच ऐकले जात नाही. मनसुख हिरेन यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले होते. पण सरकार कोणाच्याच पत्राची दखल घेत नाही. मी माजी मंत्री, विद्यमान आमदार आणि भाजपाचा प्रदेशाध्यक्ष आहे. मी एवढी पत्र पाठविली, त्याला केराची टोपली दाखवली. तर, हिरेन यांच्या पत्राची काय कथा? मी तर, या पत्रांचे पुस्तकच तयार करणार आहे, अशी कोपरखळीही त्यांनी मारली.
दोन स्तरांवर काम
कोणत्याही प्रकरणात आम्ही दोन स्तरांवर काम करण्याचा निर्णय भाजपाने घेतला आहे. एक म्हणजे, आंदोलन करून सरकारला जेरीस आणणार आणि दुसरे म्हणजे, न्यायालयात दाद मागणार. संजय राठोड प्रकरणात आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन केले. आता सोमवारी भाजपा नेत्या चित्रा वाघ मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे ते म्हणाले.
महिला दिनी काळी वस्त्रे परिधान करणार
जागतिक महिला दिनानिमित्त 8 मार्च रोजी काळ्या रंगाची वस्त्रे परिधान करून राज्यात वाढत असलेल्या महिला अत्याचारांचा निषेध करण्याचा निर्णय भाजपा कार्यकारिणीने घेतला आहे. तर, राज्यात २० हजार शक्तीकेंद्रात भाजपा २० हजार सभा घेऊन ठाकरे सरकारचा खरा चेहरा जनतेसमोर आणणार असल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.
Comments
Loading…