in ,

विधानसभा अध्यक्ष निवडणूक लांबणीवर

महाविकास आघाडी सरकारमध्ये विधानसभेचे अध्यक्षपद कॉंग्रेसच्या वाट्याला आलेलं आहे. नाना पटोले यांनी राजीनामा दिला आणि ते प्रदेशाध्यक्ष बनले, तेव्हापासून अध्यक्षपदाचे भिजत घोंगडे कायम आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा समारोप आज होणार आहे. याच दिवशी अध्यक्षपदाची निवड व्हावी, यासाठी कॉंग्रेसच्या नेत्यांनी वेगाने हालचाली सुरू केल्या आहेत. पण सहकारी दोन्ही पक्षाकडून अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याने मोठी गोची झाली आहे. जर आज अध्यक्षपदाची निवडणूक होऊन नवीन अध्यक्ष निवडला गेला नाही, तर हिवाळी अधिवेशनापर्यंत ही निवड लांबण्याची दाट शक्यता आहे.

आज झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक याच अधिवेशनात घ्यावी, अशी भूमिका कॉंग्रेसने मांडली. त्याला बैठकीत तरी प्रतिसाद मिळालेला नाही. पण आज रात्रीतून काय घडामोडी होतात, हे महत्वाचे ठरणार आहे.

अर्थसंकल्प, चर्चा आणि तो मंजूर करून घेणे, याला सरकारने प्राधान्य दिले आहे. त्यामुळेच शिवसेना आणि राष्ट्रवादी सध्यातरी निवडणूक घेण्यास तयार नाही. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक जेवढी लांबणीवर जाईल, तेवढेच आमचे नुकसान होणार असल्याचे कॉंग्रेसचे नेते खासगीत सांगतात.

विधानसभा अध्यक्षपदासाठी पृथ्वीराज चव्हाण, सुरेश वरपुडकर आणि संग्राम थोपटे यांच्या नावांची चर्चा आहे. चव्हाण यांना आसामच्या निवडणुकीसाठी कॉंग्रेसने छाननी समितीप्रमुख म्हणून नेमलेले आहे. ते सध्या तिकडेच व्यस्त असल्यामुळे उद्या जरी निवडणूक झाली तरी त्यांची येण्याची शक्यता फारच कमी आहे. संग्राम थोपटे यांना सरकार स्थापनेच्या वेळी मंत्रिपद द्यायचं जवळपास निश्‍चित झालं होतं. पण ऐनवेळी त्यांचा पत्ता कट झाला. त्यामुळे आता त्यांनी विधानसभेच्या अध्यक्षपदावर दावा केला आहे आणि त्यांच्या समर्थकांनाही यावेळी त्यांची अध्यक्षपदासाठी निवड होईल, असा ठाम विश्‍वास आहे. ही निवडणूक उद्याच व्हावी, यासाठी त्यांनीही आपल्या स्तरावर प्रयत्न चालविले आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मनसुख हिरेन यांच्या दुसऱ्या मोबाइलचं लोकेशन सापडलं… ‘एटीएस’ने केला धक्कादायक खुलासा

आसनगावच्या प्लॅस्टिक कंपनीला भीषण आग