फोन टॅपिंग प्रकरणात पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर ठपका ठेवतानाच त्यांनी केलेल्या अहवालात तथ्य नसल्याचा निष्कर्ष मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी आपल्या चौकशीत काढला आहे. त्यावरून पुन्हा एकदा भाजपा आणि महाविकास आघाडीवरून जुंपली आहे.
रश्मी शुक्ला यांच्या फोन टॅपिग प्रकरणाचा अहवाल सीताराम कुंटे यांनी ठाकरे सरकारला सादर केला. यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे. हा अहवाल सीताराम कुंटेंनी तयार केला नसून तो जितेंद्र आव्हाड किंवा नवाब मलिक यांनी तयार केला असावा, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवरून फडणवीसांवर पलटवार केला आहे. राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेला अहवाल जितेंद्र आव्हाड यांनी लिहिलेला आहे, असा आरोप राज्याचे माजी मुख्यमंत्री कुशाग्र बुद्धीचे देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. यामागील त्यांचा हेतू मला कळत नाही. हा हास्यास्पद आरोप आहे, याबद्दल माझ्या मनात शंका नाही, असे आव्हाड यांनी म्हटले आहे.
सीताराम कुंटे यांच्या प्रशासकीय सेवेतील अनुभवाचा आणि त्यांच्या प्रामाणिकपणाचा या वाक्यातून अपमान झाला आहे. एकंदर पोलीस खात्यातील अधिकारी व प्रशासकीय सेवेतील अधिकारी यांचं मनोबल खच्चीकरण करण्याच कामच जणू विरोधी पक्षाकडून सुरू आहे, असे सांगून आव्हाडांनी म्हटले आहे की, याकडे मी सकारात्मक दृष्टीकोनातून पाहतो. जितेंद्र आव्हाड अहवाल लिहू शकतात, एवढं देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केले तेच खूप झालं.
Comments
Loading…